प्रदेशाध्यक्ष आले… पण स्वागताचे ‘नियोजन’ विमानतळावरच हरवले!

मोठी सेवा संकल्प यात्रा अमरावतीत; जिल्हाध्यक्षांपासून आमदारांपर्यंत नेतृत्वाची फौज, तरी जाहिरात नाही… फ्लेक्स नाही… अन् अनेक चेहरेही नाहीत!

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : प्रदेशाध्यक्षांचा दौरा… मोठी सेवा संकल्प यात्रा… जिल्ह्यातील दिग्गज पदाधिकारी… आमदारांची फळी… ग्रामीण आणि महानगर अशी स्वतंत्र संघटनात्मक यंत्रणा! एवढे सारे असताना प्रदेशाध्यक्षांच्या अमरावती दौऱ्याचे स्वागत मात्र जणू ‘घरगुती कार्यक्रम’ असल्यासारखेच शांतपणे पार पडले, अशी चर्चा आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

‘वडनगर ते वाराणसी सेवा संकल्प यात्रा’ अमरावती जिल्ह्यात दाखल झाली. मोझरीच्या गुरुकुंज आश्रमापर्यंत यात्रेचे स्वागत झाले, सेवा उपक्रम झाले. मात्र प्रश्न आहे तो जिल्हा भाजपच्या नियोजनाचा! प्रदेशाध्यक्ष अमरावतीत येत आहेत, ही माहिती असताना शहरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पक्षाच्या वतीने एकही प्रभावी जाहिरात दिसली नाही, स्वागताचे मोठे फ्लेक्स नाहीत, शहरभर वातावरण निर्मितीचा मागमूस नाही! मग एवढ्या मोठ्या यात्रेचे आणि प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याचे नियोजन नेमके कोण करत होते, असा सवाल उपस्थित होत आहे.

‘फ्लेक्स संस्कृती’ला अचानक सुट्टी?

नेत्यांचा वाढदिवस असो, पक्षाचा कार्यक्रम असो किंवा स्थानिक राजकीय शक्तिप्रदर्शन… त्यासाठी शहरातील चौकाचौकात फ्लेक्स उभे राहतात. शुभेच्छांच्या जाहिरातींनी रस्ते सजतात. मग प्रदेशाध्यक्षांचा दौरा आला तेव्हा या फ्लेक्स संस्कृतीला अचानक सुट्टी का मिळाली? वृत्तपत्रांत जाहिराती देण्यासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या स्थानिक नेतृत्वाला यावेळी जाहिरातीची शाईच आटली होती का? असा उपरोधिक सवालही आता कार्यकर्त्यांमध्ये केला जात आहे.

विमानतळावर ‘पद’ मोठे… उपस्थिती मात्र छोटी?

प्रदेशाध्यक्ष अमरावती विमानतळावर दाखल झाले. अशा वेळी जिल्हा भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित असते. मात्र अनेक महत्त्वाचे चेहरे विमानतळावर दिसलेच नाहीत, अशी चर्चा आहे. मग प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी निमंत्रण पोहोचले नाही की नियोजनच पोहोचले नाही? पदाधिकाऱ्यांची यादी मोठी; पण विमानतळावरील उपस्थितीची यादी छोटी, अशी स्थिती निर्माण झाली का?

जिल्हाध्यक्षांपासून आमदारांपर्यंत… तरी समन्वयाचा ‘पत्ता’ नाही?

अमरावती भाजपकडे जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, महानगर नेतृत्व, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि मतदारसंघनिहाय आमदार अशी मोठी संघटनात्मक फळी आहे. तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्यापासून इतर प्रमुख नेत्यांपर्यंत नेतृत्वाची मोठी यंत्रणा कार्यरत असताना प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात या यंत्रणेचा ‘आवाज’ मात्र कुठेच ऐकू आला नाही, अशी चर्चा रंगली आहे. मोठमोठ्या पदांची मिरवणूक असताना कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी कोणाची? हा साधा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे.

प्रदेशाध्यक्षांचा दौरा की ‘लो-प्रोफाइल’ कार्यक्रम?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा दौरा हा संघटनेसाठी महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. अशा वेळी पक्षाची ताकद, संघटनात्मक एकजूट आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती दाखविण्याची संधी असते. मात्र अमरावतीत दौरा मोठा, यात्रा मोठी; पण स्वागताचे नियोजन मात्र ‘लो-प्रोफाइल’! त्यामुळे आता भाजपच्या जिल्हा नेतृत्वाच्या नियोजन क्षमतेवरच कुजबुज सुरू झाली आहे.

टोमणा कार्यकर्त्यांचाच…

प्रदेशाध्यक्ष आले;
यात्रा आली;
नेते आले;
पदाधिकारी आहेत;
आमदार आहेत…

मग प्रश्न एवढाच—

फ्लेक्स कुठे?
जाहिराती कुठे?
स्वागताचे नियोजन कुठे?
आणि विमानतळावरचे ‘मानकरी’ कुठे?

पदांची गर्दी असूनही नियोजनाची उणीव जाणवली, तर दोष कोणाचा?

की ‘सगळं ठरलं होतं’… फक्त ठरवणाऱ्यांनाच माहिती होतं?

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…