अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी (प्रतिनिधी) : अमृत सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अहिल्यानगर येथे ‘अमृत युवा ऊर्जा’ हा युवकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात १२० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पंडित यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लोकतंत्र मिरर न्यूजचे जिल्हा प्रमुख राधेश्याम कुलकर्णी, अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर आणि जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक सुनील पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात अमृत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यानंतर अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली.
लोकतंत्र मिरर न्यूजचे जिल्हा प्रमुख राधेश्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजच्या ‘जेन-झी’ पिढीने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्या जीवनाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन केले. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या आदर्श राष्ट्रपुरुषांच्या चरित्रग्रंथांचे अध्ययन करावे. थोर पुरुष आणि समाजसुधारकांचे विचार, आदर्श व मूल्ये आत्मसात करून त्यानुसार जीवन जगावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही संस्था कार्य करते.
सद्यस्थितीत ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराती, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार, हिंदू-वीरशैव लिंगायत, हिंदू लिंगायत आणि अग्रवाल आदी जातींचा समावेश आहे. या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले.
संकेतस्थळ : [https://mahaamrut.org.in/](https://mahaamrut.org.in/)
संपर्क क्रमांक : ९११२२२८७६९


