नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नांदेड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.
बैठकीस नांदेड उत्तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड, उपअभियंता सतीश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील सद्यस्थितीतील ८४.६१ टक्के पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत काटेकोरपणे वापरण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच किवळा साठवण तलाव आणि इसापूर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याचाही आढावा घेण्यात आला.
मुख्य जलवाहिन्यांमधील गळती तातडीने रोखणे, पाण्याचा अपव्यय थांबवणे तसेच अनधिकृत पाणी उपशावर प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका आणि पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे पाणीबचत, वितरण आणि पाण्याच्या वापराचा आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. विविध जलप्रकल्प व धरणांमधील पाणीसाठ्याचे नियमित व अचूक मोजमाप करून त्यानुसार पाणीपुरवठ्याचे रोटेशन निश्चित करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


