पुणे , आशिष ( औंढेकर प्रतिनिधी) : गणपती उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही नांदेड सिटी रेसिडेन्शिअल डॉक्टर्स असोसिएशन आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी येथील अँफीथिएटर (गणेश मंडप) येथे भव्य निःशुल्क मेगा हेल्थ चेकअप कॅम्प उत्साहात संपन्न झाला. नांदेड सिटी, पुणे तसेच परिसरातील नागरिकांसाठी हे आरोग्य शिबिर पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, नगरसेवक सुभाष नाण्हेकर, नांदेड सिटी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष व नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते आणि रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिरीष पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सुधीरजी काळकर, सुजित कार्ले, अॅड. नरसिंह लगड, प्रकाश गोरे, विकास लगड, विकास देडगे, नाना देशमुख, संतोष मते, शंकरराव इंगवले, दत्ताभाऊ कोल्हे, श्री पाडळकर, राहुल देशमुख, मारुती फदले, मारुती चालूचे, ज्ञानेश्वर सोळसकर, साहित्यिक गिरीश वसेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. अनिल दुधभाते, डॉ. ऋषिकेश दामले, डॉ. हरीश गोरे, डॉ. वैशाली गोमसाळे, डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. अनंत शिरुरे, डॉ. रामचंद्र पाडळकर, डॉ. सुशील टिकर, डॉ. व्यंकट जांभळे, डॉ. वैशाली गोसावी, डॉ. शशांक खेडकर आणि डॉ. गौरी पंडितराव यांच्यासह विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे परमानंद पोतदार, गायकवाड, सतीश खानझोडे, प्रमोद कुलकर्णी, मारुती सावंत तसेच रामचंद्र मिशनच्या विजयाताई लोणकर यांचीही उपस्थिती होती. सर्व डॉक्टरांचा कर्मचारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अनिल दुधभाते यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘नेत्रकोष’ या डोळ्यांच्या आजारांवरील उपयुक्त पुस्तकाची प्रत तसेच सुंदर छोटेसे रोप भेट देऊन मान्यवरांचा सन्मान केला. शिबिराला मार्गदर्शन करताना आमदार भीमराव तापकीर यांनी निःशुल्क सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. समाजाच्या आरोग्यासाठी डॉक्टर देत असलेल्या सेवेमुळे डॉक्टरांना ‘देव’ का मानले जाते, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.
या आरोग्य शिबिराचा ४०० पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. विविध वैद्यकीय शाखांमधील ४० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सहभाग घेतला. सामान्य आरोग्य तपासणीबरोबरच अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, स्त्रीरोग, आयुर्वेद, दंतचिकित्सा, होमिओपॅथी, कान-नाक-घसा, बालरोग, फिजिओथेरपी आणि आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळाले. याशिवाय बीपी, रक्तातील शुगर, हाडांची घनता तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. आयोजकांनी ५०० हून अधिक रुग्णांच्या तपासणीचे नियोजन केले होते. नियोजन, व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या सहकार्यामुळे शिबिर सुरळीतपणे पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली गोमसाळे आणि डॉ. वैशाली गोसावी यांनी केले, तर डॉ. दामले यांनी आभार प्रदर्शन केले. नांदेड सिटी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजोपयोगी ठरला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


