नांदेड उत्तर मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची आमदार बालाजी कल्याणकरांकडून पाहणी

शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये पीक नुकसानभरपाईसह शेतमजुरांसाठी रोजगाराची मागणी

नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधि ) : राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे नांदेड जिल्ह्यासह नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मतदारसंघातील विविध दुष्काळग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

आमदार कल्याणकर यांनी कासारखेडा, नांदुसा, चिखली बुद्रुक, भालकी आदी गावांपासून दुष्काळी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर मतदारसंघातील विविध ग्रामीण भागातील गावांना भेटी देत ढोकी, पिंपळगाव (कोरका), राहाटी, सोमेश्वर, जैतापूर या गावांपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली. मतदारसंघातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या पाहणीदरम्यान सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, केळी तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. सोयाबीन पिकाची वाढ झालेली असली तरी पाण्याअभावी शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरलेले नसून अनेक ठिकाणी शेंगा चपट्या झाल्या असून करपून गेल्याचे दिसून आले.

कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बोंडगळती होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मूग, उडीद तसेच इतर खरीप पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. हळद पिकावरही कोरड्या दुष्काळाचा गंभीर परिणाम झाला असून उष्णतेमुळे हळदीचे कंद पूर्णपणे भरत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर केळी आणि इतर फळपिकांचेही पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी आमदार कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. दुष्काळी परिस्थितीमुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर शेतमजुरांसमोरही उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत. पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शेतमजुरांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतपातळीवरील रस्त्यांची कामे हाती घेणे, जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची संपूर्ण पाहणी करून आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार तसेच कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकरी व शेतमजुरांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, शेतमजुरांना रोजगार, जनावरांसाठी चारा-पाणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रश्न आगामी विधानसभा अधिवेशनात प्रभावीपणे मांडणार असून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानभरपाईसह पीकविमा प्रश्नावरही सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

“दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत नांदेड उत्तर मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व शेतमजुरांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. तसेच आगामी अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पीकविम्याचा प्रश्न प्रभावीपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान नांदेडचे तहसीलदार स्वप्नील दिगलवार, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांच्यासह संबंधित गावांतील मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक तसेच शासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची स्थिती आणि नुकसानीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त भागातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…