नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. दक्षिण जिल्हाध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून जोरदार निषेध नोंदवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असताना आयोगाच्या कारभाराबाबत विरोधकांकडून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणूक प्रक्रियेबाबत आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनादरम्यान केली.
या निषेध आंदोलनात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, डॉ. यशपाल भिंगे, श्रावण रापणवाड, डॉ. रेखाताई चव्हाण, ॲड. सुरेंद्र घोडजकर, राजेश पावडे, अब्दुल सत्तार, आनंद चव्हाण, संजय बेळगे, महेश देशमुख तरोडेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


