अमरावती राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अमरावती शहर गुन्हे शाखेने ग्राम राजुरा परिसरात पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रधारक आणि गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ग्राम राजुरा परिसरातील पारधी बेडा येथे एका व्यक्तीने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करत गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी ओमेश (अहोन) मयलेश चव्हाण (वय २७, रा. ग्राम राजुरा पारधी बेडा, अमरावती) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपल्या मित्राच्या पिस्तुलातून सार्वजनिक ठिकाणी दोन राऊंड फायर केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी पिस्तुलाचा मालक नितीन पोपटराव उमाटे (वय ४४, रा. बंकापुरा, अमरावती) यालाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून .32 बोरचे परवानाधारक पिस्तुल, मॅगझिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. प्राथमिक तपासात पिस्तुल हे नितीन उमाटे यांच्या नावावरील परवानाधारक शस्त्र असल्याचे समोर आले. मात्र परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून त्यांनी ते दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्याचे निष्पन्न झाले. सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे गोळीबार करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.


