कॅप्टन स्मित मच्छर यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील तबुक येथे त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
शस्त्रक्रियेनंतर कॅप्टन स्मित मच्छर यांना दुबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. दुबईतील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. स्मित हे खुलून बोलत होते आणि हसत होते, त्यामुळे कुटुंबीयांसह सर्वांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कॅप्टन स्मित सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पूर्णपणे बरे होण्यासाठी काही काळ लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या आई-वडिलांशी आणि पत्नी सोनल बेन यांच्याशी फोनवरून संवाद साधून संपूर्ण देश स्मित यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कॅप्टन स्मित मच्छर यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.


