अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी धर्माळे यांनी अमरावती शहरातील विविध शाळांना भेटी देण्याचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. “किरण सरनाईक यांना निवडून आणणारच,” असा निर्धार आशिष धर्माळे यांनी व्यक्त केला.
गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता धर्माळे यांनी वडाळी येथील महानगरपालिका उच्च माध्यमिक शाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ शिक्षकांना प्रथम पसंतीचे म्हणजेच क्रमांक एकचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि उमेदवाराविषयीचा विश्वास महत्त्वाचा ठरत असताना, प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन शिक्षकांशी संवाद साधण्याच्या माध्यमातून महायुतीच्या प्रचाराला गती देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.
या भेटीदरम्यान शाळेच्या माजी मुख्याध्यापिका लव्हाळे मॅडम, कुमारी चेतना बोंडे यांच्यासह दुपारच्या पाळीतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिक्षकांनी किरण सरनाईक यांना क्रमांक एकचे मत देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अमरावती पंचायत समितीचे माजी सभापती आशिष धर्माळे, शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख शामभाऊ देशमुख आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील केने सहभागी झाले होते. शिक्षक मतदारांपर्यंत थेट पोहोचून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी वातावरणनिर्मिती करण्यावर शिवसेनेने भर दिला असून, आशिष धर्माळे यांच्या या दौऱ्यामुळे शिक्षक मतदारसंघातील प्रचाराला आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.


