कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असे होते. शिक्षण, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांनी देशभरात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी स्थापन केलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षण आणि समाजसेवेतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


