नागपूर , सतीश तोडासे (प्रतिनिधी): इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे रामनगर इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही शाळा नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविली जाते.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांना चित्रकला व रंगकामाच्या विविध नवीन तंत्रांची ओळख करून देण्यात आली. या कार्यशाळेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आर्किटेक्ट वैशाली फुलकर होत्या. क्लबच्या अध्यक्षा श्रीमती कविता दुरगकर, ज्येष्ठ सदस्या व कलाकार श्रीमती हर्षा दवे, अनिता धुरवे आणि रितू भाटिया यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकण्याची, रंगांच्या माध्यमातून स्वतःच्या कल्पना व्यक्त करण्याची आणि आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.


