आर. प्रज्ञानंदचा ऐतिहासिक पराक्रम; नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय

नवी दिल्ली : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस स्पर्धेचे विजेतेपद जिंकत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात नवे पर्व लिहिले आहे. अंतिम फेरीत त्याने जर्मनीच्या विन्सेंट किमरचा पराभव करत ही प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या नावावर केली. विशेष म्हणजे नॉर्वे चेस स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात विजेतेपद मिळवणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी प्रज्ञानंद १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. मात्र निर्णायक सामन्यात विजय मिळवत त्याने पूर्ण ३ गुणांची कमाई केली आणि एकूण १८ गुणांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २०१३ पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत यापूर्वी कोणत्याही भारतीयाला विजेतेपद मिळवता आले नव्हते. दिग्गज विश्वनाथ आनंद तसेच विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र त्यांनाही हा मान मिळवता आला नव्हता.
प्रज्ञानंदचा हा नॉर्वे चेसमधील दुसराच सहभाग होता. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये त्याची कामगिरी काहीशी संथ राहिली, मात्र उत्तरार्धात त्याने दमदार पुनरागमन करत विजेतेपदाकडे वाटचाल केली. याच स्पर्धेत त्याने माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला क्लासिकल प्रकारात दोनदा पराभूत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
स्पर्धेत अमेरिकेचा वेस्ली सो १५.५ गुणांसह आघाडीवर होता. मात्र एलिरेझा फिरॉझाविरुद्धचा त्याचा क्लासिकल सामना अनिर्णित राहिल्याने प्रज्ञानंदसाठी किमरविरुद्धचा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. वेस्ली सोने आर्मागेडन टायब्रेकर जिंकून १.५ गुण मिळवले, पण तो १७ गुणांपर्यंतच पोहोचू शकला. एलिरेझा फिरॉझा १५.५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.दरम्यान, भारताचे विश्वविजेते डी. गुकेश आणि दिव्या देशमुख यांच्यासाठी ही स्पर्धा अपेक्षेप्रमाणे ठरली नाही. एलिरेझा फिरॉझाकडून झालेल्या पराभवानंतर गुकेशचे विजेतेपदाचे आव्हान संपुष्टात आले.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…