अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) विद्यार्थी संघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने ९ पैकी ९ जागांवर ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रातही अभाविपला मिळालेला हा विजय तरुणाईने परिषदेच्या कार्याला दिलेला कौल असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, सीजेपीची पडलेली भुरळ आणि पुण्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभाविपचा हा विजय सद्य राजकीय परिस्थितीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आणि चर्चेचा विषय ठरत आहे. नीट पेपरफुटी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाचा अभाविपलाही फटका बसला. परिषदेचे जुने कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक आणि समविचारी कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या वर्गाला परिषद या काळात अधिक आक्रमकपणे पुढे यायला हवी होती, असे वाटत होते. जंतर-मंतर आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये अभाविपने नेतृत्व केले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती, असे मानणारेही अनेक जण आहेत.
नीट पेपरफुटीपासून अभाविपने आपल्या मर्यादा आणि क्षमतेनुसार आवश्यक भूमिका घेतली. मात्र, सीजेपी आणि त्यांच्या विविधस्तरीय समर्थकांची गती, आक्रमकता, नियोजन तसेच समाजमाध्यमांवरील वेग यामुळे अभाविपने केलेले काम अपेक्षित पद्धतीने समाजापर्यंत पोहोचले नाही, अशी चर्चा झाली. त्यामुळे ‘अभाविप कुठे?’ हा प्रश्नही उपस्थित झाला. तरुणाईला ‘जेन-झी’ म्हणून स्वतंत्रपणे पाहण्याची आणि विविध सामाजिक मुद्दे त्यांच्याशी जोडण्याची प्रक्रिया हीदेखील अभाविपसमोरील एक आव्हान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील मोठी विद्यार्थी संघटना असून महाविद्यालयीन युवकांशी तिचा सातत्याने संपर्क आणि संवाद आहे. त्यामुळे तरुणाईच्या बदलत्या विचारविश्वात परिषदेची भूमिका महत्त्वाची ठरते.
राजकारण आणि समाजकारण ढवळून निघत असताना तसेच तरुणाई केंद्रित चर्चा सुरू असताना अभाविपने मिळवलेला हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. या विजयातून अराजकतेला नाकारून राष्ट्रीयतेला प्राधान्य देण्याचा संदेश मिळाला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हिंसक प्रवृत्तीपेक्षा रचनात्मकतेला स्वीकारण्याचा कौल विद्यार्थी वर्गाने दिल्याचेही सांगण्यात आले. निवडून आलेल्या कार्यकर्त्यांची नावे पाहिल्यास अभाविपच्या सर्वस्पर्शी कार्याची झलक दिसून येते. सध्याच्या सामाजिक वातावरणात जातीय ओळखीवरून चर्चा होत असताना परिषदेच्या विजयातून समरसतेचा संदेश मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अभाविपच्या जडणघडणीत प्रा. यशवंतराव केळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी कार्याच्या विचारातून विद्यार्थी संघटनेचे काम पुढे जात असल्याचेही नमूद करण्यात आले.
पंजाब आणि नाशिक येथील विजय म्हणजे सर्व काही साध्य झाले असे नाही. मात्र, विजयामुळे कार्यकर्त्यांना नवा हुरूप आणि उत्साह मिळतो. निवडून आलेल्या प्रतिनिधींची जबाबदारीही आता वाढली आहे. जिथे परिषद तिथे विद्यार्थी हिताला प्राधान्य आणि ‘शैक्षणिक परिवार’ संकल्पनेचे सबलीकरण याचा प्रत्यय आपल्या कामातून देण्याची गरज आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर प्रशासनाचा कारभार पारदर्शक आणि विद्यार्थीहिताचा राहील, यासाठी अभाविपने काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


