अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा कृषी विभागाला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील ‘इंडिया हॅबिटॅट सेंटर’ येथे २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय ‘PMFME कॉन्क्लेव्ह’मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री ना. चिराग पासवान यांच्या हस्ते हा पुरस्कार जिल्हा अधीक्षक तथा जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे, मा. अविनाश जोशी, केंद्रीय सचिव अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, मा. देवेश देवाल, सहसचिव अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय तसेच कृषी संचालक विजयकुमार आवटे आदी मान्यवर उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत १,८५५ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहिल्यानगरचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. पुरस्कारांच्या वर्गवारीत महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक येण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरासरी ११.६८ लाख रुपयांचे प्रकल्प कर्ज आणि सरासरी ४.२७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगांना सुमारे ७९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रियादार संघटित क्षेत्रात येण्यास मदत झाली असून, त्यांना बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ झाले आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असून, जिल्ह्यातच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. पालकमंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व बँका, कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि जिल्हा संसाधन व्यक्तींनी संघभावनेने काम केले. सर्व यंत्रणांच्या सहयोगामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला केंद्र शासनाच्या स्तरावर हा पुरस्कार प्राप्त झाला, असे कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी नमूद केले.


