चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी): सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT) पॉलिटेक्निक, चंद्रपूर येथील प्रथम वर्षाच्या ९८ डिप्लोमा विद्यार्थ्यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथील इन्क्युबेशन सेंटर – टाटा मोटर्स येथे औद्योगिक भेट दिली. महाविद्यालयाचे डॉ. अनिल चिताडे आणि पॉलिटेक्निकचे प्रा. रोशन रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली या एकदिवसीय भेटीचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती देणे, सैद्धांतिक ज्ञानाचा औद्योगिक क्षेत्राशी संबंध जोडणे तसेच नवोन्मेष, इन्क्युबेशन आणि उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या भेटीचा उद्देश होता. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना इनोव्हेशन डिझाईन, प्रॉडक्ट लाइफसायकल मॅनेजमेंट (PLM), मेकॅट्रॉनिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स सिम्युलेशन, अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इलेक्ट्रिक व हायब्रिड व्हेईकल, ऑटोनॉमस-कनेक्टेड-अँड-इलेक्ट्रिफाइड व्हेईकल, व्हॅल्यू इंजिनिअरिंग, बेंचमार्किंग तसेच प्रॉडक्ट व्हॅलिडेशन अँड अॅनालिसिस यांसारख्या विविध प्रयोगशाळा व क्षेत्रांची माहिती देण्यात आली.
इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण बोर्ड, रिव्हर्स कॅमेरा व पार्किंग सिस्टीम, औद्योगिक रोबोट वर्क सेल, कन्व्हेयर-आधारित असेंब्ली लाइन आणि विविध यंत्रसामग्रीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, ऑटोमेशन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहन तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, नवोन्मेष आणि उद्योजकता यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच औद्योगिक शिस्त, सुरक्षितता आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
या औद्योगिक भेटीचे समन्वयक प्रा. आशिष भरडकर होते. त्यांच्यासह प्रा. प्रकाश सोनडवले, प्रा. गौरी बुराडकर, प्रा. पूजा भोमा आणि प्रा. आशिष गोंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही भेट यशस्वी करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर – टाटा मोटर्स आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


