मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अन्न व औषध निरीक्षक (Food Inspector) भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच नंतर ई-मेलद्वारे ती तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याने संपूर्ण प्रकरणात नवा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीकडे उमेदवारांसह राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
एमपीएससीची अन्न व औषध निरीक्षक पदाची परीक्षा २२ मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. १ ते २१ जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर २३ जुलै रोजी आयोगाकडे ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर एमपीएससीने तत्काळ दखल घेत संबंधित तक्रारदाराला पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच तक्रारदार आणि संबंधित उमेदवारांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आले असून आज त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.
दरम्यान, चौकशीपूर्वीच तक्रारदाराने आणखी एक ई-मेल पाठवत धक्कादायक दावा केला. त्यामध्ये, “पुन्हा परीक्षा लांबणीवर जाऊ नये म्हणून पेपरफुटीचा बनाव रचला,” असे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मूळ तक्रारीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचबरोबर, कथित प्रकाराशी संबंधित संभाषण २० मार्च रोजी झाल्याचा दावा असताना त्याबाबतची तक्रार अंतिम निकालानंतरच का करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.
नंदुरबार कनेक्शनचीही चर्चा
या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. मालेगावमधील एका विद्यार्थिनीने पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत तक्रार दिली होती. मात्र, प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत, “माझ्याकडून कोणताही पेपर लीक झालेला नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे,” अशी भूमिका मांडली आहे. सध्या या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित असून आजच्या चौकशीत नेमके सत्य काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीनंतरच पेपरफुटीच्या आरोपांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.


