मुंबई : देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रासह २१ राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला असून काही भागांसाठी रेड अलर्टही घोषित करण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ७५ ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या दक्षिण झारखंड आणि लगतच्या उत्तर ओडिशा परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील काही भागांतही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील देहरादून, हरिद्वार, नैनीतालसह सहा जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि चंदीगडमधील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हरियाणातील सात जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून राजस्थानातील सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बिहारमध्ये ७ ते १२ जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेशातील ३१ जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


