देहू : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूनगरी आज भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले. हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत पायी मार्गस्थ झाले असून, पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर चांदीच्या रथातून पालखी पुण्याकडे रवाना होईल.
वारीसाठी लागणारे भुसार साहित्य, भाजीपाला, मंडप साहित्य, तंबू आणि इतर आवश्यक सामग्रीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या पालखी रथासह सिंहासन, पादुका आणि इतर पूजासाहित्याला आकर्षक स्वरूप देण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.यंदाच्या वारीत पालखी रथाच्या पुढे २७ मानाच्या, तर मागे ३७० दिंड्या सहभागी होणार आहेत. मानकरी आणि मानाच्या दिंड्या देहूत दाखल झाल्या असून, मंदिर परिसराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान, देहू परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीकाठी एनडीआरएफचे जवान आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी १,२०० तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बससेवा, स्वागत कक्ष, औषधोपचार किट तसेच विविध ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत.
श्री शिवाजी महाराज चौकात अन्नदानाला सुरुवात झाली असून, ७ आणि ८ जुलैदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी शाळा, गृहप्रकल्पांच्या पार्किंगसह विविध ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असली, तरी काही ठिकाणी पावसामुळे गैरसोयीचे चित्रही पाहायला मिळत आहे.


