देशभर मान्सूनची दमदार एन्ट्री! मुंबईत २७ वर्षांतील विक्रमी पाऊस; अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

Monsoon 2026 : देशभरातील प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनने ९ जुलैपर्यंत संपूर्ण भारत व्यापला आहे. जून महिन्यात अनेक भागांत जाणवलेली पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून आता उत्तर भारत, मध्य भारत, ईशान्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, दिल्ली आणि एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून तापमानात सुमारे ५ ते ६ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. मात्र, अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाने दिल्लीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत दिवसभर मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी १५ ते २० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत यंदाचा मान्सून विक्रमी ठरत आहे. १ जून ते ७ जुलै या कालावधीत शहरात तब्बल १,२४० मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या २७ वर्षांतील या कालावधीतील हा सर्वाधिक पाऊस आहे. विशेष म्हणजे, ६ जुलैपर्यंतच मुंबईत सरासरी संपूर्ण मोसमी पावसाच्या ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले, काही भागांतील वाहतूक विस्कळीत झाली, तर झाडे पडणे आणि दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या. आगामी काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गुजरातमध्येही मान्सूनचा तडाखा कायम आहे. वडोदरा, सुरत, वापी आणि नवसारीसह अनेक शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक वाहने अडकली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, कोकण-गोवा, केरळ व माहे, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी-कराईकल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि गांगेय पश्चिम बंगाल या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि खराब हवामानाच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…