पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. मंगळवारी (७ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत धरण ८१ टक्के भरल्यानंतर नवीन मुठा उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास खडकवासला धरण ८५ ते ९० टक्के भरल्यानंतर सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून ३,७८५ एमसीएफटी (३.७८५ टीएमसी) पाण्याची आवक झाली आहे. तसेच सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सकाळी ६ या अवघ्या १३ तासांत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात २.३६ टीएमसीची वाढ नोंदविण्यात आली. यामध्ये वरसगाव धरणात सर्वाधिक १,४३५ एमसीएफटी पाण्याची आवक झाली आहे.
संभाव्य विसर्गाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रातील साहित्य, जनावरे व इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन विभागाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


