देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. RTI मधून मिळालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील सुमारे ३०.९१ लाख निष्क्रिय PF खात्यांमध्ये तब्बल ९,३३० कोटी रुपयांची दावा न केलेली रक्कम पडून आहे.Employees’ Provident Fund Organisation च्या माहितीनुसार, ही आकडेवारी ३१ मार्च २०२६ पर्यंतची आहे. या निष्क्रिय खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे पैसे अडकून पडले आहेत.
एका वर्षात घट, पण रक्कम अजूनही मोठी
RTI आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी निष्क्रिय खात्यांची संख्या ३१.८३ लाख होती. ती एका वर्षात सुमारे ९२ हजारांनी कमी होऊन ३०.९१ लाखांवर आली आहे. त्याचप्रमाणे दावा न केलेल्या PF रकमेचा आकडाही १०,१८१ कोटी रुपयांवरून कमी होऊन ९,३३० कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच सुमारे ८५१ कोटी रुपयांचे PF दावे या काळात निकाली निघाले आहेत.
कोट्यवधींचे कष्टाचे पैसे अजूनही अडकलेले
तज्ज्ञांच्या मते, ही रक्कम केवळ आकडेवारी नसून लाखो कर्मचाऱ्यांचे कष्टाचे पैसे आहेत, जे विविध कारणांमुळे आजही त्यांच्या खात्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत.अंदाजानुसार, ही रक्कम इतकी मोठी आहे की त्यातून मोठ्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी वापर होऊ शकतो, असेही विश्लेषणांमध्ये नमूद केले जाते.
नवीन EPF प्रणालीचा उद्देश
सरकारने २९ जून २०२६ पासून PF व्यवस्थेत सुधारणा करत नवीन डिजिटल आणि सुलभ प्रणाली लागू केली आहे. या बदलाचा उद्देश PF क्लेम प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सोपी करणे हा आहे.
RTI मध्ये काही माहिती देण्यास नकार
RTI अहवालात काही माहिती देण्यात आलेली नाही. आधार-लिंक असलेल्या निष्क्रिय खात्यांचा तपशील, तसेच जास्त शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती EPFO कडून गोपनीयतेच्या कारणास्तव शेअर करण्यात आलेली नाही.


