नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या १०४ व्या सालाना उर्सानिमित्त ताजबाग ट्रस्टला १० लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी हा धनादेश ट्रस्टकडे सुपूर्द केला. यावेळी नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्यारे जिया खान यांनी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या मानवता, बंधुभाव आणि समाजसेवेच्या शिकवणीचा उल्लेख केला. ट्रस्टला दिलेली १० लाख रुपयांची देणगी शिक्षण, आरोग्य, जनहिताचे उपक्रम तसेच गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ताजबाग ट्रस्ट ही केवळ धार्मिक संस्था नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, ट्रस्टचा प्रत्येक निधी पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे समाजहितासाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाबा ताजुद्दीन यांच्या विचारांनुसार सर्वधर्मसमभाव, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देत भविष्यात जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभारण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ताजबाग ट्रस्टच्या कामकाजात गेल्या काही काळात अनेक सकारात्मक बदल झाल्याचा दावा करण्यात आला. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, चढाव्याच्या सुरक्षित व्यवस्थेची अंमलबजावणी, ट्रस्टच्या उत्पन्नात वाढ, परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम, तसेच ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालय आणि शाळा सुरू करण्यासारखे उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात समाजोपयोगी प्रकल्पांना अधिक गती देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


