पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच आधारलेली नसून संतत्वावरही उभी आहे. वृत्तीत सेवा आणि समर्पणाचा भाव नसेल तर संस्कृतीला अर्थ राहत नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सत्याचे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मनोहारी मैत्र संघ, पुणे यांच्या वतीने गुरुवारी (दि. २९) मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात गुरुवर्य केशवराव जेधे स्मरणार्थ पुरस्कार लालासाहेब मोहिते यांना, छत्रपती व्यंकोजीराजे भोसले स्मरणार्थ पुरस्कार ॲड. मारुती आबा गोळे यांना, ह. भ. प. हैबतराव आरफळकर स्मरणार्थ पुरस्कार डॉ. अरविंद नेरकर यांना, आचार्य प्र. के. अत्रे स्मरणार्थ पुरस्कार डॉ. सुभाष तळेकर यांना, मदर तेरेसा स्मरणार्थ पुरस्कार कैलास दुधाळे यांना, तर डॉ. आनंदीबाई जोशी स्मरणार्थ पुरस्कार डॉ. गजेंद्र देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी संस्कार इंगळे आणि दक्ष सरकार या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
इतिहासात डोकावले असता समाजसेवेचे व्रत घेऊन अनेकांनी कार्य केल्याचे दिसून येते. हीच परंपरा निःस्वार्थ भावनेने पुढे सुरू आहे, याबद्दल डॉ. सबनीस यांनी आनंद व्यक्त केला. समता आणि सत्याचा प्रतिसाद समाजात उमटणे आवश्यक असून, त्यातून एक चांगली परंपरा निर्माण होणे मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.
मनोहारी मैत्र संघातर्फे सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्ती या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने ऊर्जास्रोत आहेत, असे सांगून राजेंद्र पवार म्हणाले की, सत्कारमूर्तींनी सेवाभावी वृत्तीने समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पोहोचवला आहे. त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने अलौकिक आहे. ॲड. प्रमोद आडकर यांनी मनोहारी मैत्र संघाच्या कार्याचे कौतुक केले. शोधक नजरेने सामाजिक आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही योग्य बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


