राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यानुसार भविष्यात लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक केले जाऊ शकते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा प्रस्ताव अभ्यासाधीन असल्याचे समोर आले आहे. पावसाळी अधिवेशनात बालविवाहासंदर्भातील लेखी उत्तरात सरकारने याबाबतची माहिती दिली.सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या जास्त आहे. परभणी, बीड, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक मुलींची लग्ने १८ वर्षांपूर्वी झाल्याचे आढळून आले आहे. बीडमध्ये हे प्रमाण ४३.७ टक्के, धुळ्यात ४०.५ टक्के तर सोलापुरात ४०.३ टक्के असल्याची माहिती सरकारने दिली.
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायद्याची अंमलबजावणी, विविध नियम आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत.याच पार्श्वभूमीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू असून, याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. बालविवाह रोखण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


