पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात म्हणून पाहिले जात असलेले हे प्रकरण आता कथित खुनाच्या दिशेने वळले आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात सिया आणि चेतन यांच्यातील सततचा संपर्कही समोर आला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून जून महिन्यापर्यंत दोघांमध्ये तब्बल दोन हजार फोन कॉल झाल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या संभाषणाचा कालावधी २३८ तासांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.१८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा दरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेतील काही संशयास्पद बाबींमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासात मिळालेल्या पुराव्यांनुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, घटनेच्या काही दिवस आधीही केतनला त्याच किल्ल्यावर नेण्यात आले होते. त्या वेळीही त्याला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी साप दिसल्यामुळे गोंधळ उडाला आणि प्रकार झाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेतन चौधरी हा चेहरा झाकून फिरताना दिसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच घटनेच्या दिवशीही सिया आणि चेतन यांच्यात संपर्क झाल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे.
केतन आणि सिया यांचा विवाह येत्या नोव्हेंबरमध्ये होणार होता. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे केतनच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे


