नागपूर : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा सुरू असून प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान या विषयांवर भाष्य करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या ‘देऊळ बंद २’नेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत यशाची घोडदौड कायम ठेवली आहे.
राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, जळगाव, पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी ३.०५ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या १९ दिवसांत ७० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून कथानक, संवाद, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहांकडे वळत असल्याने अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत.
दरम्यान, चित्रपटाच्या यशानिमित्त नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेला निर्माते कैलास वाणी, लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, अभिनेते मुकुंद वसूले, तंत्रज्ञ संकेत घोटकर, लीड मीडिया पीआर अँड मार्केटिंगचे कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली.
वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २’चे लेखन व दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात मोहन जोशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, सविता मालपेकर, मंगेश देसाई, ओम भुतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेशी, केदार सोमण, अतुल कुडले, मुकुंद वसूले आणि प्रविण तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणाच्या जोरावर ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


