महाराष्ट्रात सध्या दुहेरी संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे बर्ड फ्लूने राज्यात शिरकाव करत परिस्थिती अधिक गंभीर केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नवापूरमधील तीन पोल्ट्री फार्ममधून घेतलेल्या नमुन्यांची चाचणी इंदूर येथील प्रयोगशाळेत करण्यात आली होती. या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत 1 लाख 40 हजार कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोल्ट्री उद्योगालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या ठार केल्या जाणार आहेत. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तीन किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि पाच किलोमीटरचा बफर झोन निश्चित करण्यात येणार आहे. नवापूर परिसरात सुमारे 10 लाख कोंबड्या असल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी सुरू केली असून निष्काळजीपणा करणाऱ्या संचालकांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. दरम्यान, राज्यात वाढत्या उष्णतेमुळे आतापर्यंत उष्माघाताने 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूच्या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिकनच्या सेवनाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाने बाधित पोल्ट्री फार्मना नियमानुसार मदत देण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


