नांदेड. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिले.
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या वतीने डॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रस्तावित असलेल्या ‘लाडके मायबाप योजना’ या संकल्पनेला विशेष पाठिंबा दर्शविला. ही योजना प्रत्यक्षात लागू व्हावी आणि त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाची मर्यादा ६० वर्षेच ग्राह्य धरावी, तसेच ज्येष्ठ नागरिक ही देशाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात पारित केलेल्या कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, एसटी आणि रेल्वे प्रवासात सवलती द्याव्यात, निराधार व गरजू ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्डाच्या माध्यमातून थेट मानधन मिळावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
याशिवाय स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक मंत्रालय व आयोग स्थापन करणे, जिल्हास्तरावर ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे, तसेच प्रत्येक तालुका आणि शहरातील प्रत्येक प्रभागात विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण आरोग्य कवच, करमुक्ती, विधिमंडळ व संसदेत फेस्कॉमच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक समूहाला प्रतिनिधित्व मिळावे, तसेच ज्येष्ठ नागरिक महामंडळात फेस्कॉमचे अध्यक्ष आणि सर्व प्रादेशिक अध्यक्षांचा समावेश करावा, अशा मागण्यांनाही आमदार हेमंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबावर ओझे न वाटता सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी हयातीत नियमित मानधन देण्यात यावे. तसेच निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी ‘अंत्यसंस्कार विधी सहाय्यता निधी’ उपलब्ध करून द्यावा, या मागणीचेही त्यांनी महत्त्व मान्य केले.
ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य आणि सन्मान निर्माण करण्यासाठी या मागण्या महत्त्वपूर्ण आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात आमदार हेमंत पाटील हा प्रश्न उपस्थित करणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तसेच प्रस्तावित ‘लाडके मायबाप योजना’ प्रत्यक्षात येण्याच्या अपेक्षाही अधिक बळावल्या आहेत.


