नागपूर,अनघा पेंडके(प्रतिनिधी) : सरस्वती विद्यालय येथे शिक्षक प्रशिक्षणार्थींसाठी ‘बाल्यावस्था’ (Early Childhood) या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बालपणातील आनंद, खेळातून शिक्षण, सर्वांगीण विकास, निसर्ग, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशक शिक्षण अशा विविध संकल्पना आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून साकारल्या.
प्रत्येक रांगोळीत बालमनाचे संगोपन, जडणघडण, प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि आनंददायी शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच बालशिक्षणाविषयीची समज अधिक दृढ झाली. सर्जनशीलता, सांघिक भावना आणि अध्ययन यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला. या स्पर्धेत कांचन चौधरी यांनी प्रथम, भावना गौर यांनी द्वितीय, तर प्रेरणा मुप्पीडवार यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे परीक्षण सौ. वैशाली जगताप आणि सौ. अनघा पेंडके यांनी केले. त्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींच्या कलात्मकतेचे, कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. श्री. टी. के. वेंकटेश यांनी शिक्षकवृंद आणि प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक करत त्यांच्या सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन दिले. बालपणातील निरागसता, आनंद आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविणारी ही स्पर्धा सर्वांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरली.


