अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जागृत व नवसाला पावणारे प्रसिद्ध ‘श्री वरदविनायक देवस्थान’ नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार अनादी काळापासून गोमाता पवित्र व पूजनीय मानली जाते. कामधेनू गोमाता ही भारतीय शेती आणि आरोग्याचा आधार आहे. भगवान प्रभू रामचंद्र यांच्या कुळातील राजा दिलीप यांच्यापासून भगवान श्रीकृष्ण ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गोमातेची सेवा केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच गोमातेला आईचा बहुमान प्राप्त झाला आहे. अशा सवत्स (वासरासह) गोमातेचे दीपावलीपूर्वी येणाऱ्या द्वादशीला अर्थात वसुबारसेच्या दिवशी श्रद्धापूर्वक पूजन करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जपली जाते.
कोतुळ येथील ‘श्री वरदविनायक देवस्थान ट्रस्ट’ व ‘जयभवानी संस्कृती संवर्धन मंडळ, कोतुळ’ यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सामूहिक ‘सवत्स धेनू’ पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या गोपूजन सोहळ्यास गोप्रेमी भाविक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे, विनय समुद्र, कुलदीप नेवासकर, सचिन पाटील, प्रा. संभाजी पोखरकर, अजित आरोटे, सागर सोनुले, संतोष घाटकर, विद्या परशुरामी, वृषाली समुद्र, प्रियंका पाटील व वर्षा नेवासकर यांनी केले आहे.


