नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ. सुप्रिया संजय पाटील रातोळीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आपल्या तीन महिन्यांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील धनादेश त्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, संकटग्रस्त नागरिक आणि दुष्काळ निवारणाच्या कामासाठी त्याचा उपयोग व्हावा, या उदात्त भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंतीपत्र सादर केले असून, तीन महिन्यांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्वीकारण्याची विनंती केली आहे.
संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या त्यांच्या या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा प्रभारी माजी आमदार सुनील राणे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, एकनाथ पवार, निलेश देशमुख बारडकर, संजय पाटील रातोळीकर आणि ॲड. ज्ञानेश्वर मोरे उपस्थित होते.


