नांदेड. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाडी (बुद्रुक) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच गरजू नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
वाडी (बुद्रुक) येथे उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे नांदेड उत्तर मतदारसंघासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण यावेळी करण्यात येईल. त्याच परिसरात नर्सिंग महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे आणि नर्सेस वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीच्या बांधकामाचाही शुभारंभ करण्यात येणार आहे.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटप, पाणी टँकरचा प्रारंभ, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील गरजू विद्यार्थिनींना सायकली आणि विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
शेतकरी कुटुंबांना आधार देणे, विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांना स्वावलंबी बनविणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमात नांदेड शहर आणि परिसरातील विविध रस्ते विकासकामांचे लोकार्पणही होणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक ७५२ वरील चोंडी, कुरुंदा, मालेगाव आणि तरोडा नाका परिसरातील रस्त्यांच्या कामांसह पूर्णा रोड–मालेगाव रोड–हिंगोली रोड या नांदेड शहर उत्तर बाह्यवळण मार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
याशिवाय नांदेड शहर पश्चिम बाह्यवळण रस्त्याचे लोकार्पण तसेच शासकीय विश्रामगृह, पावडेवाडी नाका, मोर चौक ते छत्रपती चौक या मार्गावरील राज्य महामार्ग क्रमांक ६१ च्या लिंक रोडच्या डांबरी नूतनीकरणाचे लोकार्पण होणार आहे. नांदेड शहर पश्चिम बाह्यवळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या पोहोचमार्गासह बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे.
या विकासकामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर राहणार असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हेमंत पाटील यांच्यासह आमदार राजेश पवार, बाबुराव कदम कोहळीकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, भीमराव केराम, जितेश अंतापुरकर, डॉ. तुषार राठोड, आनंदराव पाटील बोंढारकर आणि ॲड. श्रीजयताई चव्हाण यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, उमेश मुंडे, विनय गिरडे आणि विवेक देशमुख यांनी केले आहे.


