नांदेड. शहरातील चैतन्यनगर ते विमानतळ रोड महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या सुमारे पावणेदोन किलोमीटर लांबीच्या ‘आसना गार्डन’च्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्च २०२६ मध्ये गार्डनच्या विकासाचे काम पूर्ण झाले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नांदेड-वाघाळा महापालिका यांच्यात हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याने गार्डनची दुरवस्था होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा आसना मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष आनंद कल्याणकर यांनी केला आहे.
नियमानुसार गार्डन महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत चार पत्रे पाठविल्याचे सांगण्यात येते. मात्र, महापालिकेकडून प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी उपस्थित केल्या जात असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा आरोप कल्याणकर यांनी केला आहे.
दोन्ही शासकीय यंत्रणांमधील प्रशासकीय प्रक्रियेच्या पेचात गार्डनच्या नियमित देखभालीचा प्रश्न निर्माण झाला असून, त्याचा परिणाम येथील हिरवळ आणि झाडाझुडपांवर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गार्डनच्या जागेची मालकी महापालिकेकडे असल्याने दिवाबत्ती आणि पाण्याची मोटार चालविण्यासाठी आवश्यक वीज जोडणी घेणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेने वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीसाठी अर्जही केलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वीज जोडणीअभावी पाण्याची मोटार आणि ठिबक सिंचन व्यवस्था सुरळीत चालविण्यात अडचणी येत असल्याने गार्डनमधील हिरवळ वाळत आहे. तसेच शोभेच्या झाडांवर कीटकनाशकांची फवारणी होत नसल्यामुळे झाडे रोगांच्या विळख्यात सापडली असून, काही ठिकाणची हिरवळ जळून गेल्याचेही कल्याणकर यांनी सांगितले.
नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेल्या या गार्डनची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही शासकीय यंत्रणांकडून पुरेशी देखभाल होत नसल्याचे चित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.
प्रशासकीय वादामुळे गार्डनचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी तातडीने हस्तांतरणाचा प्रश्न सोडवावा. तसेच गार्डनची देखभाल सक्षम स्वयंसेवी संस्थेकडे सोपविण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी आनंद कल्याणकर यांनी केली आहे.
आसना गार्डनमधील हिरवळ, झाडे आणि सिंचन व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती पावले उचलतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


