नांदेड. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत भेसळयुक्त, निकृष्ट आणि नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत राज्यभरातून सुमारे ३५.५४७ टन अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १७९.९७ लाख रुपये आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील देगलूरजवळील खानापूर एमआयडीसी परिसरातील उमेश अॅग्रो इंडस्ट्रीज येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. भेसळीचा संशय असल्याने येथून १,५२८ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या तेलाची अंदाजे किंमत १३ लाख ५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध प्रशासनाने दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला असून, या मोहिमेमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.


