अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभागातील कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ समाज आर्थिक संकटात सापडला आहे. चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन करणे कठीण झाले असून, मेंढपाळ कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या संकटाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी शेकडो मेंढपाळांनी मोर्चा काढत विभागीय आयुक्तालय गाठले. यावेळी काही मेंढपाळ घोड्यावर स्वार होऊन घोषणाबाजी करत मोर्चात सहभागी झाले होते.
मेंढपाळ समाजसेवक अर्जुन नामदेवराव महानोर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. दुष्काळग्रस्त मेंढपाळांसाठी स्वतंत्र विशेष पॅकेज जाहीर करून तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. दुष्काळामुळे मेंढ्यांसाठी चारा मिळवणे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे मेंढ्यांसाठी मोफत चारा उपलब्ध करून द्यावा, चारा खरेदीसाठी विशेष निधी मंजूर करावा, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय मेंढ्या-शेळ्यांसाठी मोफत पशुवैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
मेंढपाळांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने पशुधनावर अवलंबून असतो. मात्र, दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधन जगवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदतीच्या माध्यमातून मेंढपाळ कुटुंबांना आधार द्यावा आणि पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.


