‘संघ शक्ती कलीयुगे’ हे ब्रीद ध्यानी घेऊन राष्ट्र उभारणीसाठी अधिकाधिक वेळ द्यावा : विवेक कुलकर्णी

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) : ‘संघ शक्ती कलीयुगे’ हे भगवान श्रीकृष्णाचे ब्रीद ध्यानी घेऊन राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसेवकांना अधिकाधिक वेळ द्यावा लागेल, असे प्रतिपादन बजरंग दलाचे अखिल भारतीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीरामनगर, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

कुलकर्णी म्हणाले की, पूर्वजांनी निश्चित केलेल्या सण, वार, तिथी आणि मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः विजयादशमी उत्सवाला धार्मिक आणि शौर्याचा आशय आहे. आजवर झालेल्या युद्धांमध्ये असुरी शक्तीविरुद्ध दैवी शक्तीचा संघर्ष झाल्याचे दिसून येते. रक्तबीज, शुंभ-निशुंभ यांसारख्या राक्षसांचा देवीने निःपात केला, तर प्रभू श्रीरामांनी रावणाचा अंत केला. विजयश्री प्राप्त करण्याच्या दृष्टीने विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज विजयादशमीच्या मुहूर्तावर अनेक मोहिमांची आखणी करत असत. ‘संघ शक्ती कलीयुगे’ या विचारातून प्रेरणा घेऊन पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनी अनेक उच्चशिक्षित तरुणांना राष्ट्रीय कार्याच्या प्रवाहात आणले. अणुबॉम्ब बनवण्याचे सखोल ज्ञान असलेले तरुण शास्त्रज्ञ पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या सहवासात आले आणि पुढे संघाचे प्रचारक झाले. त्यानंतर तेच सरसंघचालक झाले. याचे उदाहरण म्हणून पूजनीय रज्जू भैय्या ऊर्फ राजेंद्रसिंह यांचा उल्लेख करता येईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

जगात हजारो वर्षांपासून अनेक क्रांत्या झाल्या. या क्रांत्यांचा मुख्य उद्देश सत्तापरिवर्तन हाच राहिला. मात्र, भारतातील अनेक राजांनी केवळ धर्म आणि देशासाठी संघर्ष केला. हिंदूंची मूलभूत मानसिकता ‘स्वयमेव मृगेंद्रता’ अशी आहे. अल्पवयात रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळातील ‘जेन झी’ होते, असेही त्यांनी नमूद केले. भारताने आपला अंतिम सर्जनशील शब्द अद्याप उच्चारलेला नाही. पूजनीय डॉ. हेडगेवार यांनी पाहिलेल्या वैभवशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वयंसेवकांना संघकार्यासाठी देण्यात येणारा वेळ वाढवावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ व सिनर्जी अकॅडमीचे संचालक डॉ. दत्ताजी पोंदे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतात विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या संशोधनाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, भविष्यातील आव्हानांबाबत उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी उपस्थित होते. प्रोफेसर चौक येथील समर्थ विद्या मंदिर प्रशालेपासून प्रेमदान चौक, मनमाड रस्ता, माऊली संकुल आणि तोफखाना पोलीस ठाणे मार्गे संघाचे सघोष पथसंचलन काढण्यात आले. या संचलनात बाल स्वयंसेवकांपासून ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण गणवेशात सहभागी झाले होते. संचलनानंतर जाहीर शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. श्रीरामनगरचे कार्यवाह राधेश्याम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला. संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…