अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार रवि राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी शिंदे यांचे स्वागत केले. यानंतर निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आयोजकांच्या माहितीनुसार ५०० हून अधिक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि सुमारे २ हजार शिक्षक मतदार उपस्थित होते. रवि राणा यांनी महायुतीतील सर्व आमदारांनी युतीधर्म पाळून किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. “आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, शब्द देऊन पळणारे नाही. आधीही कार्यकर्ता म्हणून काम करायचो, आजही करतो,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवार अॅड. प्रीती रेवणे यांनी उमेदवारी मागे घेऊन किरण सरनाईक यांना पाठिंबा दिल्याबद्दल शिंदे यांनी रवि राणा यांचे आभार मानले. यावेळी युवा स्वाभिमान शिक्षक आघाडीची स्थापना करण्यात आली. बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार संजय कुटे, आमदार उमेश यावलकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आशीष धर्माळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.


