राजन शेळके, (प्रतिनिधी) : आज, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्र महोत्सवातील श्री शके १९४८ च्या सप्तमी तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई वैष्णवी रूपात सजली आहे.
जगदंबेच्या अनेक रूपांपैकी अष्टमातृका ही महत्त्वाची रूपे मानली जातात. दुर्गासप्तशतीतील कथेनुसार रक्तबीज दैत्याच्या वधासाठी, तर शिवपुराणातील कथेनुसार अंधकासुराच्या वधासाठी सर्व देवांच्या शक्तींनी मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून प्रकट झाल्या. यामध्ये भगवान शिवाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, इंद्राची इंद्राणी, ब्रह्माची ब्राह्मी, नरसिंहाची नारसिंही, वराहाची वाराही आणि भगवान विष्णूंची मूर्तिमंत शक्ती असलेली वैष्णवी यांचा समावेश आहे.
भगवती वैष्णवीच्या हातातील शंख हा भगवान विष्णूंच्या नादब्रह्माचे, चक्र गतिमानतेचे, गदा क्रियाशक्तीचे, तर पद्म पालनतत्त्वाचे प्रतीक मानले जाते. वैष्णवीच्या पितांबराचा पिवळा रंग तिची निर्मितीसह पालन करण्याची क्षमता दर्शवतो. अशी ही भगवती वैष्णवी गरुडारूढ अर्थात गरुडावर विराजमान झालेल्या रूपात भक्तांना दर्शन देत आहे.


