पिंपरी-चिंचवड , आशिष औंढेकर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरात १८, २०, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विविध ५० ठिकाणी विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव, तर २७ ठिकाणी पथसंचलने होणार आहेत.
चिंचवड, पिंपरी, काळेवाडी-रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रावेत, आकुर्डी, वाकड, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, संत तुकाराम नगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, देहू, देहूरोड, चिखली, निगडी, संभाजीनगर, आळंदी, चऱ्होली, दिघी, मोशी, भोसरी आणि इंद्रायणीनगर या भागांत उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उत्सवांमध्ये शारीरिक व घोष प्रात्यक्षिके, गीतगायन तसेच पारंपरिक शस्त्रपूजन होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे. विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवांमध्ये नागरिकांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.


