ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधा परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन

मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली १४ तालुक्यांचा आढावा; सर्व कामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मूलभूत सुविधांनी परिपूर्ण व सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींच्या मूलभूत पायाभूत सुविधा परिपूर्णता अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात तालुकानिहाय पायाभूत सुविधांची सद्यस्थिती व प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे तालुकानिहाय सद्यस्थिती, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित कामांची माहिती सादर केली.

या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्रे, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य संस्था, ग्रामपंचायत कार्यालये, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाणी गुणवत्ता व सुरक्षितता, स्मशानभूमी, पशुवैद्यकीय सुविधा, दुष्काळ व्यवस्थापन व चारा नियोजन तसेच तलाव व जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील सर्व घटकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील विद्यमान परिस्थितीचे विश्लेषण करून आवश्यक कामांना प्राधान्य देण्याबाबत यावेळी चर्चा व नियोजन करण्यात आले.

संपूर्ण जिल्ह्यासाठी मूलभूत सुविधांच्या आढाव्याचा एकसमान नमुना निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार बैठकीत ११ उद्दिष्टांशी संबंधित तालुकानिहाय पायाभूत माहितीचे संकलन करण्यात आले. या माहितीच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील आवश्यक कामे निश्चित करून त्यांचे सविस्तर नियोजन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांमधील त्रुटी ओळखून त्या दूर करण्यासाठी एकसमान व नियोजनबद्ध कार्यपद्धती राबविण्यास मदत होणार आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सर्व नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कामांना गती द्यावी, तसेच प्रत्येक काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमित आढावा, अचूक माहिती संकलन आणि विभागांमधील समन्वय यांना विशेष महत्त्व देण्याचेही त्यांनी सूचित केले.

या बैठकीस जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच तालुका स्तरावरील आरोग्य, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम, सिंचन, कृषी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मूलभूत सुविधांनी समृद्ध, सक्षम आणि नागरिकांच्या गरजांना पूरक बनविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…