नांदेड, प्रतिनिधी : महाभारतातील अंबा, कुंती आणि द्रौपदी या स्त्री व्यक्तिरेखा म्हणजे केवळ पौराणिक कथांचा भाग नसून अन्यायाविरुद्ध संघर्ष, आत्मसन्मान आणि स्त्रीशक्तीचे प्रभावी प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. दीपक कासराळीकर यांनी केले. नवरात्रोत्सवानिमित्त दिपनगर येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित तीन दिवसीय प्रवचनमालेत ‘महाभारतातील स्त्री व्यक्तिरेखा’ या विषयावर ते दुसऱ्या दिवशीचे व्याख्यान गुंफताना बोलत होते.
महर्षी व्यासरचित महाभारत हे केवळ युद्धाचे महाकाव्य नसून मानवी स्वभाव, नातेसंबंध, महत्त्वाकांक्षा आणि धर्म-अधर्म यांचा वेध घेणारा जीवनग्रंथ आहे. ‘यतो धर्मस्ततो जयः’ या सूत्राचा अर्थ स्पष्ट करताना धर्माच्या मार्गावर चालणे आणि अन्यायाचा प्रतिकार करणे, हीच महाभारताची प्रमुख शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले. अंबेच्या जीवनातील संघर्षाचा आढावा घेताना अन्याय करणारी व्यक्ती कितीही सामर्थ्यवान असली, तरी तिच्याविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. अंबेचा संघर्ष आणि शिखंडीच्या रूपातील तिची भूमिका अन्यायाविरुद्धच्या जिद्दीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुंतीच्या व्यक्तिरेखेतून मातृत्व, त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळते. अनेक प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जात तिने पांडवांना एकत्र ठेवले. तिच्या जीवनातून दुःखातही कर्तव्याची वाट न सोडण्याचा संदेश मिळतो, असे कासराळीकर म्हणाले. द्रौपदीच्या व्यक्तिरेखेचे विश्लेषण करताना त्यांनी द्यूतसभेतील तिच्या निर्भीड प्रश्नांचा विशेष उल्लेख केला. सभेतील ज्येष्ठांच्या मौनाला जाब विचारणारी द्रौपदी ही अन्याय सहन करणारी नव्हे, तर त्याविरुद्ध आवाज उठविणारी स्त्री होती, असे त्यांनी सांगितले. अंबेचा संघर्ष, कुंतीचा त्याग आणि द्रौपदीचा स्वाभिमान या तीनही व्यक्तिरेखा आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आहेत. स्त्री ही केवळ सहनशीलतेचे प्रतीक नसून अन्यायाला आव्हान देणारी आणि समाजाला नवी दिशा देणारी शक्ती आहे, हा विचार त्यांच्या व्याख्यानातून अधोरेखित झाला.


