पुणे, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी सूर्यवंशी अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच ट्रस्टच्या माजी अध्यक्ष सुनील रासने यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळाच्या बैठकीला सुनील रासने, महेश सूर्यवंशी, विद्यमान उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त राजेंद्र गावडे, पराग वांबूरे, रोहित लोंढे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. महेश सूर्यवंशी हे बी.ई. सिव्हिल पदवीधर असून बांधकाम व्यावसायिक आहेत. १९८४ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून ते सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यात सक्रिय झाले. १९९६ मध्ये त्यांची मंडळाच्या कार्यकारिणीवर निवड झाली. त्यानंतर २००१ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची नियुक्ती झाली. २०१० मध्ये त्यांनी ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
त्यांचे वडील अॅड. शंकरराव सूर्यवंशी हे ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष होते. वित्तीय कामकाजातील काटेकोरपणा, सुसूत्रता आणि उत्तम व्यवस्थापन ही महेश सूर्यवंशी यांची प्रमुख कार्यवैशिष्ट्ये आहेत. ट्रस्टसाठी कोंढवा येथे बालसंगोपन केंद्र आणि वृद्धाश्रमाची वास्तू त्यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून उभी केली आहे. ‘सार्वजनिक विश्वस्त संस्था सत्ताकेंद्र न होता मानवसेवेचे सेवाकेंद्र झाले पाहिजे,’ हा सूर्यवंशी यांचा विचार असून, त्यानुसार आगामी काळात कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
मागील बैठकीतील निर्णयानुसार अध्यक्षपदाचे नियोजन
ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी ठरविण्यात आलेल्या नियोजनानुसार, २०२२ ते २०२४ या कालावधीत माणिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत सुनील रासने यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी महेश सूर्यवंशी अध्यक्षपदी कार्यरत राहणार आहेत. तर, २०३१ ते २०३६ या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.


