सरस्वती विद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा सप्ताहा’चा समारोप उत्साहात संपन्न

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्याचा विद्यार्थ्यांना संदेश

नागपूर,अनघा पेंडके प्रतिनिधी : दक्षिण भारतीय शिक्षण संस्था द्वारा संचालित सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शंकरनगर, नागपूर येथे आयोजित ‘मराठी अभिजात भाषा सप्ताह–२०२६’चा समारोप समारंभ सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा, तिचे अभिजात स्वरूप आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाषा संचालनालय, नागपूरचे अधीक्षक श्री. संजय गोरे, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूरच्या कनिष्ठ लिपिक श्रीमती चिलाटे तसेच कर्मचारी अस्मिता गिरी आणि सूरज पाटील उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये उपमुख्याध्यापिका श्रीमती शैली अय्यर, पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे आणि श्री. शैलेंद्र ठाकूर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, तिची साहित्यिक परंपरा आणि भावी पिढीमध्ये मातृभाषेविषयी अभिमान निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री. संजय गोरे यांनी मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि दैनंदिन जीवनातील तिचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती चिलाटे यांनीही विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी जोपासण्याचा आणि वाचनाची सवय विकसित करण्याचा संदेश दिला.

अभिजात मराठी भाषा सप्ताह ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध भाषिक, साहित्यिक आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समानार्थी शब्द शोध रेस, विरुद्धार्थी शब्द शोध रेस, प्रश्नमंजुषा, म्हणी पूर्ण करा, खजिना शोध तसेच मराठी भाषा आणि क्रीडा यांचा समन्वय साधणाऱ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मराठी भाषेवर आधारित नाटिका, साहित्यिकांचा परिचय आणि कवितांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे श्री. संजय गोरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश यांनी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे वाचन, लेखन आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवावा, असे आवाहन केले. भाषेचे संवर्धन ही केवळ एका सप्ताहापुरती मर्यादित बाब नसून ती प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा पेंडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. अश्विनी कुरळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागप्रमुख सौ. आसावरी मास्टे, वैभव कुंभरे आणि निलेश धवड यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ‘माझी मराठी, माझा अभिमान’ या भावनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान आणि साहित्याची आवड वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…