नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटकाळात बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी पुढाकार घेत आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २ लाख ४५ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास सर्वच भागांत अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. उत्पन्न घटल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आमदार जितेश अंतापुरकर यांनी हा निर्णय घेतला. बळीराजावर आलेले संकट हे केवळ त्यांचे वैयक्तिक संकट नसून संपूर्ण समाजावर आलेले संकट आहे. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या मागे उभे राहत त्यांना आधार देणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याची भावना आ. अंतापुरकर यांनी व्यक्त केली.


