अभाविपच्या ‘देवी अहिल्या युवती संमेलनात’ ६०० विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

महिला सुरक्षा, संस्कृती, उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्वावर मार्गदर्शन

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहिल्यानगर येथे ‘देवी अहिल्या युवती संमेलन’ आयोजित करण्यात आले. सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या संमेलनात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे ६०० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

युवती संमेलनाचे आयोजन दोन सत्रांमध्ये करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, कोहिनूर मॉलच्या संचालिका श्वेताताई गांधी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, संमेलन प्रमुख सृष्टी ताके आणि जिल्हा संयोजक रोहन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ वर्षांच्या प्रवासाची माहिती देत युवतींच्या सामाजिक सहभागाविषयी मार्गदर्शन केले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच महत्त्वपूर्ण मुद्द्यांची त्यांनी मांडणी केली. युवतींनी केवळ शिक्षण आणि करिअरपुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग आणि जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. श्वेताताई गांधी यांनी विद्यार्थिनींना उद्योजकतेकडे वळण्याचे आवाहन केले. या मार्गदर्शनाने संमेलनातील पहिले सत्र उत्साहात पार पडले. दुसऱ्या सत्रात महिला सुरक्षा आणि संस्कृती या विषयांवर भाषण व चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व अभ्यासक ॲड. वर्षाताई डहाळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या सत्रातून विद्यार्थिनींमध्ये आपल्या सांस्कृतिक परंपरेविषयी आत्मीयता जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. या सत्राला अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन्ही सत्रांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या शेवटी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माऊली संकुल सभागृहापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सहभागी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रोफेसर चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या युवतींनी आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि राष्ट्रनिर्माणाची भावना जोपासत विविध क्षेत्रांत पुढे यावे, हा संदेश या संमेलनातून देण्यात आला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…