नांदेड, रविंद्र औंढेकर (विशेष प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याला सर्वोच्च प्राधान्य देत स्कूल बस व व्हॅनचालक-मालकांनी परिवहन विभागाशी सुसंवाद साधावा. नियमांच्या चौकटीत राहून आवश्यक ते सहकार्य करण्याची विभागाची भूमिका असून, चालक-मालकांच्या कायदेशीर अडचणी संवादातून आणि कायदेशीर मार्गाने सोडवल्या जातील, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी केले.
स्कूल बसवरील दंडात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग आणि स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेजा, अजित बोरकर, परिवहन निरीक्षक मंगेश गवारे, अनुश्री केंद्रे, प्रदीप ननवरे, अमित देऊळकर, कोमल रनमोडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. यावेळी स्कूल बस-व्हॅन चालक-मालक संघटनेच्या वतीने १५० पेक्षा अधिक पुष्पहार घालून परिवहन अधिकाऱ्यांचे गांधीगिरी करत स्वागत करण्यात आले.
यावेळी निखिल लातूरकर यांनी वाहनांची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. कागदपत्रांची तपासणी किंवा नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाईला संघटनेचा विरोध नसल्याचे स्पष्ट करत, प्रथम सूचना देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच स्कूल बसच्या फिटनेस तपासणीसाठी स्वतंत्र रांग किंवा स्वतंत्र वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. स्कूल बस आणि व्हॅनच्या फिटनेस तपासणीसाठी सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.
वाहनांच्या मंजूर आसनक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. तपासणीदरम्यान वाहन थांबवण्याची सूचना मिळाल्यास पळून जाण्याऐवजी सुरक्षितपणे वाहन थांबवावे, असेही स्पष्ट करण्यात आले. विमा, फिटनेस, परवाने आणि अन्य आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले. तसेच दरांमधील अनावश्यक स्पर्धा टाळण्यासाठी चालक-मालक, पालक, शाळा आणि परिवहन विभागाच्या प्रतिनिधींच्या सहभागातून किलोमीटरनुसार दर निश्चित करण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. यावेळी गोविंद पवार, नामदेव केंद्रे, सलमान, प्रमोद राजेगोरे, माऊली बोकारे, रफिकभाई, ख्वाजाभाई, पप्पीभाई, शिवा माळगे, भीमराव सोनकांबळे, गोविंद पावडे, संतोष राहेवार, राजेंद्र माने, अनिल केंद्रे, गंगाधर कळके यांच्यासह नांदेड जिल्हा स्कूल बस-व्हॅन संघटनेचे ४०० ते ५०० पदाधिकारी आणि वाहनचालक उपस्थित होते.


