नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात सन 2018 पासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक पुयड व त्यांच्या पथकाने नांदेड शहर हद्दीत फरार आरोपींचा शोध सुरू केला होता. पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत वजीराबाद पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अण्णा भाऊ साठे चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव सुरेश कामाजी शिंदे (वय 49, व्यवसाय चालक, रा. नंदनवन, ता. कंधार, जि. नांदेड; सध्या रा. अबचलनगर, खुरसाळे हॉस्पिटलजवळ, नांदेड) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने साथीदारांसह वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभिलेखाची पडताळणी केली असता, आरोपीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. 92/2018, कलम 420, 467, 468, 471, 472, 120 (ब), 34 भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


