अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तूर आणि कापूस पिके अडचणीत आली असून, पिकांच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अपर वर्धा जलाशयातून तिवसा तालुक्यातील शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
या मागणीच्या अनुषंगाने खासदार बळवंत वानखडे यांच्या पत्रानुसार काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता राजभोज तसेच उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी ७ सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली.
दरम्यान, आगामी रब्बी हंगामातील पाणी नियोजनाचाही मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून निदान चना पिकासाठी तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांचे हे पीक हातात राहण्यास मदत होईल, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज
तिवसा तालुक्यात तूर व कापूस ही प्रमुख पिके सध्या वाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात आहेत. मात्र, पावसात खंड पडल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे जलाशयातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्याचा शेतीसाठी वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी
यावेळी जिल्हा सचिव काँग्रेस मुकुंद देशमुख, तालुका अध्यक्ष व नगरसेवक वैभव वानखडे, माजी जि.प. सदस्य अभिजित बोके, खरेदी-विक्री संघाचे संचालक रवींद्र हांडे, सतीश पारधी, पंकज देशमुख, सेतू देशमुख, राजेश थोरात, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रद्युम पाटील, अतुल खुळे, विश्वजित बाखडे, नरेश साबळे, प्रणव गौरखेडे, शेख फारूख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
‘रब्बी’च्या पाण्याचे नियोजन कधी?
तूर-कापूस वाचविण्यासाठी सध्या पाणी गरजेचे; आगामी रब्बी हंगामात चना पिकासाठीही पाणी उपलब्ध करून देण्याची काँग्रेसची मागणी.


