अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्यासोबतच देवस्थानांच्या मालमत्ता व इनाम जमिनींचे संरक्षण, मंदिर संस्थानांचे पारदर्शक व प्रभावी व्यवस्थापन आणि विश्वस्तांना कायदेशीर व प्रशासकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषद २०२६ आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी अमरावतीतील श्री एकविरा देवी मंगल कार्यालय, जनार्दन पेठ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही महापरिषद होणार आहे.
या महापरिषदेस महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त, मुंबई अमोघ कलोती, धर्मादाय विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कायदेविषयक तज्ज्ञ आणि वकील यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिरांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय व्यासपीठ
मंदिर विश्वस्तांना दैनंदिन व्यवस्थापनापासून ते मालमत्ता, इनाम जमिनी, लेखापरीक्षण, हिशेब, आवश्यक कागदपत्रे आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संबंधित विविध प्रक्रियांपर्यंत अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्तांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या समस्या, सूचना आणि अनुभव शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या महापरिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
मंदिरांच्या मालमत्ता व जमिनींचे संरक्षण, संस्थानांचे सुयोग्य व्यवस्थापन, हिशेब व लेखापरीक्षण, धार्मिक व सामाजिक उपक्रम, जनसहभाग, मंदिर विकास तसेच विविध कायदेशीर अडचणी यावर परिषदेत चर्चा होणार आहे. संबंधित अधिकारी आणि कायदेविषयक तज्ज्ञांकडून विश्वस्तांना मार्गदर्शन मिळणार असून, मंदिरांच्या प्रश्नांवर पुढील काळात प्रभावीपणे काम करण्यासाठी कृती आराखड्यावरही चर्चा केली जाणार आहे.
‘अनेक मंदिर, एक संघटन, एक दिशा’
‘अनेक मंदिर – एक संघटन – एक दिशा’ या संकल्पनेतून ही राज्यस्तरीय महापरिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांना संघटित करून त्यांच्या अडचणी आणि प्रश्नांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमधील मंदिरांचे अध्यक्ष, विश्वस्त, सचिव, पदाधिकारी आणि सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
१४ हून अधिक बैठका; गावागावांत जनजागृती
महापरिषदेच्या तयारीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर आतापर्यंत १४ हून अधिक बैठका घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून महापरिषदेची प्रसिद्धी सुरू असून, अमरावती शहरासह विविध तालुक्यांमध्ये बॅनर लावून जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रतिनिधी विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन विश्वस्तांना महापरिषदेचे निमंत्रण देत आहेत. या उपक्रमाला मंदिर विश्वस्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आयोजकांनी केला.
मंदिरांच्या प्रश्नांवर मोकळा संवाद
महापरिषदेच्या माध्यमातून केवळ मार्गदर्शन न करता मंदिर विश्वस्तांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनातील अडथळे, कायदेशीर प्रश्न, जमिनी व मालमत्तेचे संरक्षण, प्रशासनाशी समन्वय, आर्थिक पारदर्शकता आणि मंदिर विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर विश्वस्तांना आपली मते मांडता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील मंदिर संस्थानांच्या व्यवस्थापनाला अधिक सक्षम करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी पत्रकार परिषदेत नागेश्वर महादेव संस्थान धामंत्रीचे अध्यक्ष कैलाशकुमार पनपालिया, पिंगळा देवी संस्थान नांदुरा पिंगळाईचे सचिव आशिष मारुडकर, महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, महारुद्र मारुती संस्थान जहागीरपुरचे अध्यक्ष ओमप्रकाश परतानी, चंद्रभागेश्वर महादेव संस्थान चांदूर रेल्वेचे अध्यक्ष कैलाश गिरोळकर, रघुनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष धनराज वेलणकर, रुक्मिणी जन्मभूमी विदर्भ पीठचे श्रीकृष्ण माहोरे, देवस्थान समितीचे रोहन ढोमणे, नागेश्वर महादेव संस्थान धामंत्रीचे विश्वस्त मोहन इंगळे, विजय करडे, रवींद्र भोयर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र देवस्थान समितीचे संघटक कैलाशकुमार पनपालिया यांनी राज्यातील सर्व मंदिर विश्वस्तांनी महापरिषदेत सहभागी होऊन आपल्या मंदिरांच्या समस्या, सूचना आणि अनुभव मांडावेत, असे आवाहन केले आहे.


