उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव; महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे ७५ खेळाडूंचा सत्कार

क्रीडा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान; पियूष राठोडचा विशेष गौरव

 नागपूर,अनघा पेंडके ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र क्रीडा मंडळ, नागपूरच्या वतीने ‘उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार समारंभ’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खो-खो क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सुमारे ७५ उत्कृष्ट खेळाडूंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव डॉ. पद्माकर चारमोडे यांनी प्रास्ताविकातून मंडळाची वाटचाल, क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून Calderys India Refractories Ltd. चे फायनान्स डायरेक्टर अविनाश कहाले उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून Logic Max Enterprises Pvt. Ltd. चे जीएम रूपक इंगळे आणि जिल्हा खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश तुमसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजय दातारकर यांनी भूषविले.

यावेळी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुमारे ७५ खेळाडूंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. खेळाडूंच्या यशामागे पालकांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे प्रोत्साहन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

पियूष राठोडचा विशेष गौरव

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू पियूष राठोड याचा विशेष सत्कार. राठोड याने नुकतीच सीए (CA) परीक्षा उत्तीर्ण करून क्रीडा क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या दुहेरी यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पियूष राठोड याने मेहनत, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर क्रीडा व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत यश मिळविता येते, असा संदेश दिला. सत्कारमूर्ती खेळाडूंच्या पालकांपैकी सौ. अनघा पेंडके यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी खेळाडूंच्या यशामध्ये पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा संस्थेच्या प्रोत्साहनाचे महत्त्व सांगितले.

मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर क्रीडा क्षेत्रात पुढे जावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. विजय दातारकर यांनी महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे पदाधिकारी सचिन देशमुख, समीर लोही, समीर चिटणीस, प्रेम राखडे, सौरभ दुबे यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन वैभव कुंभरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुधीर चिटणीस यांनी मानले.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…